पिंपरी : भाजप नेते, माजी नगरसेवक तथा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ पवार यांनी शिवबंधन बांधलं. आपल्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या सोबत भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चेतन महादू पवार यांनी देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
एकनाथ पवार बोलताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा देत शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. 30-32 वर्षापासून मी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचं काम करत असताना देखील मी नांदेड मधील लोहा कंधार या मतदारसंघात गेल्या चार वर्षापासून विकासासाठी काम करत आहे. इतक्या जुन्या शहराची स्थिती अगदी गंभीर आहे. तेव्हा ती स्थिती बदलण्यासाठी, विकासासाठी मी तिथे काम करेन आणि पुढला आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेचाच असेल असा मी शब्द देतो, अशा शब्दात एकनाथ पवार यांनी आपल्या भावना व्यत्त केल्या.
एकनाथ पवार हे 1990 पासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. भाजपचे सरचिटणीस, युवा अध्यक्ष, जिल्हाअध्यक्ष, शहराध्यक्ष, महापालिकेत नगरसेवक, सत्तारुढपक्ष नेते अशी पदे त्यांनी भुषविली आहेत. पवार यांनी जुन्या नेत्यांच्या बरोबरीनं भाजपचं काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने शहर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली होती. आज त्यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करून चर्चेंना पूर्णविराम दिला.




