मुंबई: शेगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे या अतिशय शांत आणि मनमिळावू राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही नेत्यावर वैयक्तिक टीका केली नाही. मतदारसंघातील विकास कामांवर त्यांनी जोर दिल्याने त्यांना कार्यसम्राट आमदार ही पदवीच मतदारांनी बहाल केली आहे. पतीच्या निधनानंतरही खचून न जाता जनसेवेचं काम पुढे नेटणाऱ्या मोनिका राजळेंच्या कार्याचा घेतलेला हा आढावा….
घरीच राजकारणाचा वारसा
मोनिका राजळे यांच्या सासरीच राजकारणाचा वारसा होता. त्यांचे पती दिवंगत राजीव राजळे हे माजी आमदार होते. तर त्यांचे सासरे अप्पासाहेब राजळे सुद्धा माजी आमदार होते. त्यामुळे घरातच राजकीय वारसा त्यांना मिळालाहोता. विशेष म्हणजे तालुक्याच्या पहिल्या आमदार होण्याचा मानही त्यांच्याकडेच जातो. त्यामुळेच त्या सलग दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून येऊ शकल्या आहेत. त्यांना कृष्णा आणि कबीर ही दोन मुले आहेत. कृष्णा उच्च शिक्षण घेत आहे.
अन् तिकीट मिळालं
2014 मध्ये विधानसभेची निवडणूक सुरू होण्याआधीच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं होतं. त्यावेळी भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाच्या सहानभूतीमुळे मोनिका राजळे विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019ची विधानसभा निवडणूक त्रिशंकू होऊनही राजळे यांनी दणदणीत मतांनी विजय मिळविला होता. अगदी भाजपमध्ये दोन गट असतानाही त्यांनी विजय मिळविला होता.
“राजळे हटाव, भाजप बचाव”
दरम्यान, 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वपक्षीयांकडूनच मोठा विरोध सहन करावा लागला होता. “राजळे हटाव, भाजप बचाव” या घोषणांसह राजळे विरोधी मोहिमेला स्थानिक भाजपमध्ये वेग आला होता. विशेष म्हणजे राजळेंना विरोध करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा देखील पार पडला होता. यावेळी पंकजा मुंडे समर्थक देखील राजळेंच्या विरोधात उतरले होते. मागील 5 वर्षात अनेक ठिकाणी डावलून अपमानास्पद वागणूक दिली. त्याला वाचा फोडण्यासाठीच सर्व मूळ भाजप आणि मित्र पक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचं मत संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं होतं. विशेष म्हणजे भाजप युवामोर्चाचे आणि पंकजा मुंडे समर्थक अमोल गर्जे, जिल्हापरिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते. मात्र, या सर्वांवर मात करून राजळे उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरल्या होत्या.




