पिंपरी : औद्योगिक नगरी, ऑटो हब, आयटी हब म्हणून नावारूपाला आलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. राज्य सरकारच्या आयटी पॉलिसीचा अभ्यास सुरू असून, या धोरणानुसार पहिला प्रकल्प मोशी-च-होली- चिखली या झपाट्याने विकसित होणाऱ्या समाविष्ट गावांमध्ये व्हावा, याकरिता भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मागणी केली आहे.
राज्यात पहिले माहिती तंत्रज्ञान आणि साहाय्यभूत सेवा धोरण १९९८ मध्ये तयार केले होते. राज्याच्या नवीन आयटी- २०२३ धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आमदार महेश लांडगे, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि क्रेडाईचे सदस्य अरविंद जैन यांच्यात चर्चा झाली.
राज्यात माहिती तंत्रज्ञान उद्याने, सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर, एव्हीजीसी तसेच नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्मिती करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यात येईल. यामध्ये मुद्रांक शुल्क माफी, ऊर्जा सुसूत्रीकरणाचे लाभ, विद्युत शुल्क सूट, बाजार विकास सहाय्य, पेटंट संबंधित सहाय्य, मालमत्ता कर सूट, रहिवाशी, ना- विकास क्षेत्रासह हरितक्षेत्र इ. क्षेत्रात आयटी झोन विकसित करण्याची मुभा, इन्फ्रास्ट्रक्चर, अतिरिक्त चटईक्षेत्र असा विविध पातळीवर रेड कार्पेट’ देण्यात येईल. सुमारे १० एकर जागेत ५० टक्के आयटी आणि ५० टक्के प्रकल्प विकसितसाठी प्रोत्साहन देणार आहे.
राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा धोरण क्षेत्रामध्ये आगामी काळात ९५ हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्याचे ध्येय आहे. या धोरणाची अंमलबजावणी करून पहिला आयटी प्रकल्प पिंपरी-चिंचवडमधील वेगाने विकसित होणाऱ्या चहोली- मोशी- चिखली रेसिडेंसीयल कॉरिडॉरमध्ये व्हावा. लवकरच बैठक घेण्याची मागणी राज्य शासनाकडे केली.
– महेश लांडगे, आमदार




