पिंपरी. : देहू येथील गायरान जागा पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाला देण्यास देहूकरांनी विरोध दर्शवल्यानंतर पोलिसांनी पर्यायी जागेची चाचपणी सुरू केली. त्यानुसार, आयुक्तालय, मुख्यालय परेड ग्राऊंडसाठी मोशी गायरान जागेची पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पाहणी केली.
यावेळी पोलिस सहआयुक्त संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना निकम, पोलिस उपायुक्त शिवाजी पवार उपस्थित होते.
शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन होवून पाच वर्षे उलटूनही आयुक्तालयासाठी हक्काची जागा मंजुरी मिळाली. मात्र, या जागेला स्थानिक नागरिक आणि शेतकन्यांचा विरोध आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनही केले. त्यामुळे, पोलिसांनी पर्यायी जागेचा शोध घेत मोशीतील गायरान जागेची पाहणी केली.
पोलिस ठाण्यांसाठी जागा उपलब्ध
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने अस्तित्वात आलेले परिमंडळ तीन व सांगवी पोलिस ठाण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. परिमंडळ एक व दोनची विभागणी करून परिमंडळ तीन अस्तित्वात आले. त्यास काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली. मात्र, या कार्यालयासाठी जागा उपलब्ध नसल्याने आयुक्तालयाकडून पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, एमआयडीसीकडून टेल्को रस्त्यालगत वीस गुंठे जागा भाडेकरारावर आयुक्तालयाला मिळाली. यास नाममात्र भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच सध्या एका सोसायटीच्या गाळ्यांमध्ये भाडेतत्वावर सुरू असलेल्या सांगवी पोलिस ठाण्यालाही लवकरच हक्काची जागा मिळणार आहे. सांगवीतील सर्व्हे क्रमांक तेरामधील जागा देण्यास मंजुरी मिळाली असून त्यासाठी जलसंपदा विभागाला निधी वर्ग करण्यात येणार आहे.
सहायक पोलिस आयुक्त, जनसंपर्क अधिकारी सतीश माने म्हणाले, ‘आयुक्तालयासह मुख्यालय परिमंडळ तीन, सांगवी पोलिस ठाण्यासह इतर ठाणे व कार्यालयांसाठीही जागांची आवश्यकता आहे. दरम्यान, परिमंडळ तीनसाठी ‘एमआयडीसीतील टेल्को रस्त्यावरील जागा उपलब्ध झाली आहे.




