पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एके काळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले असताना आता मध्यवर्ती कार्यालयेही समोरासमोर असणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यालयांमध्ये केवळ पुणे-मुंबई महामार्ग असणार आहे. यामुळे दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
यापूर्वी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून पक्ष कार्यालय काळेवाडी येथे सुरू करण्यात आले होते. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांच्या मागणी नंतर काळेवाडी येथून पक्ष कार्यालय पिंपरी चौकात स्थलांतरित करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला. दिनांक 2 डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पदाधिकारी व नगरसेवक यांनी पक्ष फुटी नंतर अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तर काही माजी नगरसेवक व भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक तुषार कामटे या तरुण नेतृत्वाच्या खांद्यावर शरद पवार गटाकडून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देत पक्ष संघटना वाढवण्यावर भर दिला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्याकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. मागील काही महिन्यात त्यांचे शहरात दौरेही वाढले आहेत.




