रहाटणी : पुरुषोत्तम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात २२ जानेवारी २०२४ ला सोहळ्यात होणार आहे. हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने जय्यत तयारी सुरू केली आहे. अयोध्येतून अक्षतांचे कलश पिंपरी- चिंचवड शहरात आणण्यात आले आहेत.
श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना संपर्क अभियानासाठी श्रीराम जन्मभूमी येथून आलेल्या कलशाचे रहाटणी येथे आज गुरुवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी 9:00 ते सायंकाळी 9:00 वाजे पर्यंत दत्त मंदिर (दत्त नगर) रहाटणी येथे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक चंद्रकांत नखाते व युवा नेते शुभम नखाते यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून कलशाचे पूजन करून रामभक्तांच्या पूजनासाठी कलश ठेवण्यात आला.
या वेळी नखाते चौक ते दत्त मंदिर रहाटणी (दत्त नगर) अशी मिरवणूक काढण्यात आली. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी डोक्यावरती कलश घेऊन स्वागत केले. ग्रामस्थांच्या वतीने कलशाचे पूजन करून महाआरती करण्यात आली. याचे आयोजन श्रीराम मंदिर आयोध्या, विश्व हिंदू परिषद यांनी केले आहे.




