नागपूर : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आता शिंदे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उलटसाक्ष नोंदवण्याच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांना काही प्रश्नांचे उत्तरे थेट आणि स्पष्टपणे देता आले नाहीत. त्यांनी काही प्रश्नांवर हो किंवा नाही, असंच उत्तर देणं अपेक्षित असताना सविस्तर भूमिका मांडली. तर काही प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडायची गरज होती त्यावर आपल्याला माहिती नाही किंवा लक्षात नाही, असं उत्तर दिल्याचं बघायला मिळालं आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. गेल्या सुनावणीत ठाकरे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर आज शिंदे गटाची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटसाक्ष नोंदवण्याचं काम आज सुरु झालं. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी दिलीप लांडे यांची उलटसाक्ष नोंदवली. सुनावणीच्या सुरुवातीला दिलीप लांडे वकिलांच्या प्रश्नावर हो किंवा नाही, असं उत्तर अपेक्षित असताना लांडे सविस्तर उत्तर देत होते.
यावरुन विधानसभा अध्यक्षांनी दोन-तीन वेळा त्यांना मिश्किल टोला देखील लगावला. त्यामुळे सुनावणीला उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यावर लांडे यांनी दिलेलं उत्तर सुनावणीसाठी महत्त्वाचं आहे. देवदत्त कामत यांच्याकडून लांडे यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे प्रश्न विचारले गेले. त्यावर लांडे यांनी आपली भूमिका मांडली.



