पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात तळवडे औद्योगिक परिसरातील फायर केन्डल बनवणार्या कारखान्यामध्ये स्फोट होऊन कंपनीतील एकूण ९ निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यामधील २ कामगार हे गंभीररित्या जखमी झाले त्यांना पिंपरी चिंचवड शहरात ‘बर्न वॉर्ड’ नसल्याने आणि त्यांच्यावर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे त्या २ कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जर वायसीएम हॉस्पिटल मध्ये ‘बर्न वॉर्ड’ असता तर दोन निष्पाप लोकांचा जीव वाचला असता. त्यामुळे महापालिकेने अजून काही नागरिकांच्या जीवाशी न खेळता तातडीने शहरात ‘बर्न वॉर्ड’ची उभारणी करावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात गेल्या अकरा महिन्यांत विविध कारणांमुळे भाजल्याने मृत्यू पडलेल्यांची संख्या अधिक आहे. भाजलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे असते. मात्र, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जळीत कक्षच (बर्न वॉर्ड) नसल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्याशिवाय पर्याय राहत नाही. परिणामी, वेळेत उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याची संख्या अधिक आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या तळवडेतील दुर्घटनेनंतर बर्न वाॅर्डचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तळवडे येथील दुर्घटनेत एकूण ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन नागरिकांवर वेळेत उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. श्रीमंत असणाऱ्या महापालिकेत एकही BURN हॉस्पिटल किवा महापालिकेच्या रुग्णालयात BURN वॉर्ड ही सुविधा उपलब्ध नाही हि खूप खेदाची आणि गंभीर बाब आहे. शहरात अश्या घटना घडल्यास या जखमी रुगानांवर उपचार करण्यसाठी पुण्यातील ससून रुग्णालय किवा अन्यत्र शहरात खासगी रुग्णालयात जावे लागते, त्यामुळे अशा जाळीत दुर्घटनेतील रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांचे बळी देखील जात आहे. त्यामुळे प्रशासक तथा आयुक्त यांनी या अतिशय गंभीर बाबीचा विचार करता लवकरात लवकर प्रशासकीय स्तरावर निर्णय घेवून पिंपरी चिंचवड शहरात अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी बर्न हॉस्पिटल व महापालिकेच्या रुग्णालयात त्वरित बर्न वॉर्ड तयार करावा अशी मागणी नाना काटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.




