नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आज अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती. विधान भवनात एक अनोखा योगायोग पाहण्यास मिळाला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरेंवर चंद्रशेखर बावनकुळे टीका करत आहेत. बावनकुळे आणि उद्धव ठाकरे एकमेकांसमोर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी एकच कोपरखळी मारली आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
नागपूरच्या विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जेव्हा उद्धव ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे एकमेकांच्या समोर आले तेव्हा “काय एकटेच जाता?” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना कोपरखळी मारली. ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांचा मकाऊमधला कथित फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी त्यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. तसंच उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातही बावनकुळे यांचा समाचार घेतला होता. तर चंद्रशेखर बावनकुळे हे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा सगळ्या गोष्टी असताना हे दोन नेते समोरसमोर आले तेव्हा एका वाक्यामुळे सगळ्यांमध्येच हशा पिकला.



