पिंपरी (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) भोसरी पेठ क्रमांक १२ येथील गृह प्रकल्पात हजारो सदनिका बांधल्या आहेत. त्याठिकाणी नागरिक राहण्यास आले असून त्यांना सुविधा दिल्या जात नाहीत. एसटीपी सुरु नाही, वेळेत स्वच्छता होत नाही, कचरा संकलन केले जात नाही, विद्युत पुरवठा खंडित असतो, अशा असंख्य समस्या असताना एकच अधिकारी सर्व कामकाज हाताळत आहे. सध्या पीएमआरडीएचा कारभार भाडोत्री इमारतीमधून सुरु असून नागरिकांची कामे करण्यासाठी एजेंटाची नेमणूक केल्याचा आरोप आमदार उमा खापरे यांनी केला.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वरिष्ठ सभागृहात औचित्याचा मुद्दा मांडताना आमदार खापरे यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, पीएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात जमिनीचे सर्वेक्षण कर करण्यात येत आहे. त्यासाठी पीएमआरडीएने ड्रोनद्वारे मोजणी सुरु केली आहे. मात्र, जागेची मूळ कागदपत्र आणि ड्रोनद्वारे केलेले मोजमाप याचा ताळमेळ जुळत नसल्यामुळे मिळकतधारकांचा गोंधळ उडत आहे. त्याचबरोबर शहरी भागासह ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएची निर्मिती केली.
परंतु, आळा घालण्याऐवजी अशा बांधकामांना खतपाणी घातले जात असल्याची खंतही आमदार खापरे यांनी व्यक्त केली. आर्थिक दुर्बल गट, अल्प उत्पन्न गट आणि मध्य उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी भोसरी सेक्टर १२ येथे पहिल्या टप्प्यातील टोलेजंग गृह प्रकल्प विकसित केला आहे. त्यातील सदनिकांचे वाटपही झाले आहे. मात्र, नागरिकांना सोयी सुविधा मिळत नाहीत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. स्वच्छता वेळेत होत नाही, विद्युत पुरवठा खंडित केला जातो, सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) सुरु नाही, अशा समस्यांमुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून एकाच अधिका-याच्या हातात या प्रकल्पाचा कारभार आहे. तरीही, नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, असेही खापरे यांनी यावेळी सांगितले.




