पिंपरी (प्रतिनिधी) – चिंतामणी ज्ञानपीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा तेजस्विनी पुरस्कार उन्नती सोशल फाउंडेशनच्या संचालिका डॉ. कुंदा संजय भिसे यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर येथे कार्यक्रम झाला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते डॉ. कुंदा भिसे यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी भाजप पिंपरी चिंचवड अध्यक्ष शंकर जगताप, जेएसपीएम संस्थेचे प्रमुख विश्वस्त गिरीराज सावंत प्रमुख पाहुणे होते. ऐश्वर्या रेणुसे, युवराज रेणुसे, शर्मिला पांडे, दिलीप जगताप, विलासराव भणगे, रोहिणी शिळीमकर, डॉ. मीनल गाडेकर आदी उपस्थित होते. मानपत्र, स्मृतिचिन्ह व ज्ञानेश्वरी देऊन डॉ. भिसे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. भिसे म्हणाल्या की, फाउंडेशनच्या स्थापनेची प्रेरणा कार्यसम्राट आमदार स्वर्गीय लक्ष्मण जगताप आणि ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या प्रेरणेने झाली होती. त्यामुळे हा पुरस्कार त्यांना मी समर्पित करते. मिळालेल्या पुरस्काराने काम करण्यास अधिक बळ प्राप्त होईल.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, अवघ्या १२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले ज्ञानदानाचे काम आज विस्तारले असून चिंतामणी ज्ञानपीठाचा आज वटवृक्ष झालेला आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असताना चिंतामणी ज्ञानपीठ सारख्या संस्था शहराचे नाव देशांमध्ये मोठे करण्याचे काम करतात.
गिरीराज सावंत म्हणाले की, तेजस्विनी पुरस्काराच्या रूपाने महिलांचे सक्षमीकरण करण्याचे आणि त्यांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले जात आहे. ही खरोखरच चांगली बाब आहे. या वेळी मुलांनी मल्लखांब, लाठीकाठी, तलवारबाजी यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढवत नेली. प्रास्ताविक ऐश्वर्या रेणुसे यांनी केले.




