पिंपरी : जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण बदलू लागले आहे. मावळ लोकसभा महायुतीतील घटक पक्ष असणारा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार असल्याने लोकसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी थेट मातोश्री गाठत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
वाघेरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता संघर्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. मागील अनेक वर्षे वाघेरे पाटील कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. दिवंगत माजी महापौर भिकू वाघेरे पाटील यांचा राजकीय वारसा घेऊन संजोग वाघेरे पाटील यांनी महापौर पद भूषविले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पद काळात मोठी कारकीर्द घडविली. घरामध्ये अनेक वर्षे महानगरपालिकेचे सदस्य पद अबाधित ठेवले आहे. ते 2017 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
आता 2024 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्यामुळे या ठिकाणी खुल्या वर्गातील नेत्यांना आपल्या विधानसभेत जाण्यासाठी मनाला आवर घालावा लागत आहे. त्यानंतर लोकसभेसाठी अभी नही तो कभी नही असा इरादा घेऊन पिंपरी गावचे सुपुत्र संजोग वाघेरे पाटील यांनी महायुतीकडून तिकीट मिळण्यास अशा धुसुर दिसू लागल्याने महाविकास आघाडीकडून मावळ लोकसभेवर दावा असणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षासोबत जाणे पसंत केले. उद्या शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वाघेरे पाटील आपल्या हातात मशाल घेऊन मावळ जिंकण्याचा मनसोबा पक्का करणार आहेत.
सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदाराच्या विरोधात सुप्त लाट आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट पवार कुटुंबियातील पराभवाचा वचपा काढण्यासाठी अनेक कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेत मागील तीन पंचवार्षिक शिवसेनेच्या उमेदवार निवडून येत आहे. शिवसेनेने जेव्हा जेव्हा नवीन चेहऱ्याला संधी दिली तेव्हा त्याला जनतेने निवडून दिला आहे. आता शिवसेनेतील फुटीनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा खासदार निवडून येणार का? हेच पाहावे लागणार आहे.




