पिंपरी : गेली दीड-दोन वर्ष पार्थ पवारांच्या रिलाँचिंगची तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्ह्यातील बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक सोपा व सोयीचा असल्याची चर्चा असल्याने त्यांच्यासाठी शिरूर लोकसभेचीही गेले काही महिन्यांपासून चाचपणी सुरू आहे. मंगळवारी पार्थ पवार हे हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभेमधूनच रीलॉन्चिंग होणार ? असेच चित्र दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कधी मावळ तर कधी शिरूर लोकसभेसाठी नावाची चर्चा केली जात आहे. परंतु, मावळच्या पराभवानंतर पार्थ यांच्या राजकारणातल्या एंट्रीसाठी अजित पवारांनी सुकर आणि सुरक्षित मार्ग निवडण्याची तयारी सुरू केली आहे, असेच चित्र गेले काही दिवस दिसत आहे. दोन आडवड्यापूर्वी शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज देऊन अजित पवारांनी हडपसर मतदार संघातील जाहीर व खासगी कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. त्यात आता मंगळवारी ( दि.९) पार्थ अजित पवार हे हडपसर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व नगरसेवक यांची त्यांच्या निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयात भेट घेणार आहोत. यावरून पार्थ पवार यांचे शिरूर लोकसभा मतदार संघातूनच रिलाँचिंगची होणार, असेच चित्र सध्या तरी दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना करत दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर मतदारसंघात मांजरी बुद्रुक येथे हजेरी लावत येथील विकासकामांचा आढावा घेतला. येथे येण्याच्या एक दिवस अगोदर अमोल कोल्हे यांना ओपन चँलेंज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा शिरुर लोकसभा मतदारसंघात धडकल्याने साहजिकच त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती.त्याचवेळी खासदार डॉ. कोल्हे यांच्या समोर महायुतीचा उमेदवार कोण? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, महायुतीचा काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार आमचाच होणार, अशी खात्री व्यक्त करत अजितदादांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते.




