पिंपरी, (प्रतिनिधी)- टिकाऊ व नागरिकांना विविध कारणांकरिता उपायुक्त ठरणाऱ्या रस्त्यांचा महत्त्वाकांक्षी असा हरित सेतू हा उपक्रम स्मार्ट सिटी राबविणार आहे. शहरातील नागरिकांमध्ये पायी चालणे, सायकल चालविणे आणि धावणे या दैनंदिन आरोग्यदायी सवयींचे महत्व रुजविण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करून शहरांमधील उपलब्ध सार्वजनिक पायाभूत सुविधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पैलूंवर काम करण्यात येत आहे.
हरित सेतू उपक्रम शहरी रस्ते व सार्वजनिक परिसर विकास या राष्ट्रीय कार्यशाळांच्या मालिकेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, सहशहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया यांच्यासह ४३ शहरांमधील स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उच्चपदस्थ अधिकारी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, हरित सेतू उपक्रमामध्ये रस्त्यांचा आणि सार्वजनिक परिसरांचा विकास होणे गरजेचे असून, या कार्यशाळेच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होण्यास नक्कीच मदत मिळेल. तसेच हरित सेतूची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रीन बॉण्ड आणि सायकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट (बीआयसीआय) चा वापर केला जाईल.
इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसीच्या शाश्वत मोबिलिटीच्या प्रांजली देशपांडे व प्रताप भोसले यांनी रस्त्याच्या डिझाइनमध्ये डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. अमर करण यांनी पिंपरी चिंचवड येथील स्ट्रीट डिझाईन प्रकल्प राबविण्याच्या गुंतागुंतीवर सादरीकरण केले. त्यांनी कार्यक्षम आणि उपयुक्त रस्ते तयार करण्याच्या दृष्टीकोनावर भर दिला.




