पिंपरी, (प्रतिनिधी) निगडीतील अण्णा भाऊ साठेनगरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यास स्थानिकांचा विरोध आहे. ही योजना राबविण्याकरिता आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाला नागरिकांनी विरोध केला आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वसाहत से.नं. २२ बचाव कृती समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व नागरिक रस्त्यावर उतरल्याने संबंधित अधिकारी याठिकाणी फिरकले नाहीत. त्यामुळे सध्या दुबार पुनर्वसनाबाबत एसआरएच्या कोणतीही हालचाल नसल्याचे चित्र आहे.
निगडीतील सेक्टर क्र.२२ मध्ये नागरिकांचे महापालिकेच्या वतीने सुमारे पाच एकर जागेत पुनर्वसन केले आहे. यामध्ये एकूण २५६ कुटुंबांचा समावेश आहे. या नागरिकांना आहे त्याठिकाणी राहायचे आहे. मात्र, एसआरएच्या वतीने याठिकाणी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्याकरिता गुरूवारी (दि. ११) याठिकाणचा सर्वे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येणार होते. मात्र, या हालचालींची नागरिकांना कुणकुण लागल्याने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वसाहत से.नं. २२ बचाव कृती समितीने विरोध व निषेध करण्यासाठी नियोजन बैठक आयोजित केली होती. यामध्ये स्थानिक नागरिकांनी या नियोजित सर्वेला विरोध केला. या कामाला विरोध असल्याचे माहिती असूनही, एसआरएचे अधिकारी सर्वेला आल्यास त्यांना तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला होता.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, बापूसाहेब गायकवाड, संजय भालेराव, सूरज गायकवाड, बसवराज नाटेकर, सुलतान तांबोळी, सनी पवार, सुशील गवळी, शुभम कांबळे आदी उपस्थित होते. दरम्यान, गुरूवारी नियोजित सर्वेला विरोध करण्यासाठी सर्व नागरिक सेक्टर नं २२ मध्ये जमले होते. मात्र, एसआरएचे अधिकारी व कर्मचारी सर्वेला न आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.




