पिंपरी, दि. १७ फेब्रुवारी :- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या गरजा ओळखून महापालिका विविध उपक्रम किंवा विकासकामांचे नियोजन आखत असते. या विकासकामांसाठी विविध अनुभवी तज्ञांची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. शहराची व्यापकता आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सी.एस.आर उपक्रमातंर्गत अधिकाधिक कंपन्यांमधील अनुभवी प्रतिनिधींचे मार्गदर्शन आणि मनुष्यबळ महापालिकेस हवे आहे, असे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर कक्ष अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ४० कंपन्या तसेच विविध उद्योग समुह यांच्याद्वारे जास्तीत जास्त सी.एस.आर अंतर्गत सामाजिक उपक्रम करून त्याचा वापर समाजकल्याणासाठी करता यावा यासाठी डबल ट्री हॉटेल, चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, उप आयुक्त अजय चारठाणकर, संदीप खोत, रविकिरण घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तथा मुख्य सी.एस.आर सेल प्रमुख निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, माहिती व जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध ४० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सी.एस.आर सेलचे प्रतिनिधी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहराला पायाभूत सुविधा पुरविताना शैक्षणिक, वैद्यकीय, आरोग्य तसेच पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. यासाठी महापालिकेने विविध उपक्रम तसेच प्रकल्प राबविले आहेत. त्यातील काही प्रकल्पांमध्ये किंवा विकासकामांमध्ये सी.एस.आर निधीचा महत्वाचा वाटा आहे. सी.एस.आर निधीसोबत महापालिकेस शहरातील विविध कंपन्यांच्या अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे उभारण्यात आलेले दिव्यांग भवन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. शहरातील दिव्यांग बांधवांसाठी सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुविधा असलेले पिंपरी चिंचवडमधील दिव्यांग कल्याणकारी केंद्र कदाचित देशातील एकमेव केंद्र असेल. या केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयीसुविधा तसेच उपचार थेरपीसाठीची अत्याधुनिक उत्तम दर्जाची उपकरणे खरेदी करण्यामध्ये सी.एस.आर चा मोठा वाटा आहे. भविष्यात महापालिकेच्या वतीने विविध कल्याणकारी प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील विविध कंपन्यांमधील प्रतिनिधींच्या अनुभवाची गरज असल्याचेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.




