माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. अनेक काँग्रेस आमदार आणि नेत्यांचे अशोक चव्हाण यांना फोन करत घेतलेल्या भूमिकेला दिलं समर्थन. पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षाची साथ सोडणं अशक्य असल्याचं मत आमदारांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली होती. त्याशिवाय अनेक काँग्रेस नेते संपर्कात असल्याचं म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर आला. आता भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याचे वक्तव्य केले आहे.
कोल्हापूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. धक्कातंत्र पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असं सूचक वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केले. जिल्ह्यातील काही एकनिष्ठ भविष्यात भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये असल्याचं वाटू लागलंय. त्यामुळे भाजपकडे ओढ लागली असून रोज शेकडो जणांना प्रवेश मिळत आहे, असे महाडिक म्हणाले.



