पिंपरी – लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने दिल्लीत गौरविण्यात आले. हे केवळ मावळच्या जनतेमुळे शक्य झाले. त्यामुळे हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करत असल्याची प्रतिक्रिया खासदार बारणे यांनी दिली. दरम्यान, पुरस्कार मिळाल्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही खासदार बारणे यांचा सत्कार केला.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. तेलंगनाच्या राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते खासदार बारणे यांना 17 व्या लोकसभेतील कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, निवृत्त न्यायाधीश संजयकुमार कौल, प्राईम पॉईंट फौंडेशनचे श्रीनिवासन, प्रियदर्शनी राहुल उपस्थित होते.




