नवी दिल्ली : “गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. किमान आधारभूत किमती(MSP)सह डझनभर मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीत घुसण्याची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, त्यात सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच वर्षांचा प्रस्ताव मांडला, मात्र यावर एकमत झाले नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे.
आंदोलक शेतकरी सध्या शंभू सीमेवर ठाण मांडून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त शेतकरी उद्या दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. रस्त्यावरील पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्यासाठी जेसीबी आणि पोकलेन मशीन घेऊन शेतकरी दाखल झाले आहेत. पोलिसांच्या अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर बुलेटपासून मशीन ऑपरेटर्सचे संरक्षण करण्यासाठी या मशीन्समध्येही बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण केबिन लोखंडी जाड पत्र्यांनी फुलप्रूफ करण्यात आली आहे.




