पिंपरी (प्रतिनिधी) – पदोन्नतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दहा शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्राथमिक आणि उर्दू माध्यमांच्या शाळांवर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी नियुक्ती करण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने – केली आहे. प्राथमिक शिक्षण – विभागाच्या मराठी माध्यमासाठी – आठ तर उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी २ मुख्याध्यापकांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका शाळेतील २८ शाळांमध्ये – कायमस्वरूपी मुख्याध्यापक नेमले नव्हते. या शाळांचा कारभार प्रभारी नियुक्त केलेल्या मुख्याध्यापकांवर सुरू होता. त्यापैकी उपशिक्षक आणि पदवीधर असलेल्या १० जणांना मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती दिली आहे. त्यामुळे उर्वरित १८ – शाळांना मुख्याध्यापक नियुक्तीची प्रतीक्षाच आहे. मुख्याध्यापक नेमलेल्या शाळांमध्ये वाल्हेकरवाडी कन्या प्राथमिक शाळा, काळभोर नगर प्राथमिक शाळा, बोऱ्हाडेवाडी कन्या प्राथमिक शाळा, थेरगाव मुले प्राथमिक शाळा क्र.६०/ १, थेरगाव कन्या प्राथमिक शाळा, भुमकरवस्ती मुले प्राथमिक शाळा, संत तुकारामनगर मुले प्राथमिक शाळा, सोनवणेवस्ती प्राथमिक शाळा, नेहरुनगर उर्दू माध्यम प्राथमिक शाळा, श्रमिकनगर उर्दू माध्यम प्राथमिक शाळा आदींचा समावेश आहे.
महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर मुख्याध्यापक अभिनामाची रिक्त असणारी पदे पदोन्नतीने भरण्याकरिता १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पदोन्नती समिती सभा घेण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील अन्वयेचे निर्देश विचारात घेत आवश्यक तपशील पडताळले. आरक्षण देवून रिक्त असणाऱ्या पदावर शिक्षक कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापक अभिनामाचे पदावर तात्पुरत्या स्वरूपात ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यास शिफारस केली आहे.




