नवी दिल्ली ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्यात एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. गडकरी यांनी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना त्यावर एक नोटीस पाठवली आहे. काल गडकरी यांचा हा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर न्त शेअर करण्यात आला होता. मात्र या फसव्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी या नोटीशीच्या संदर्भात उत्तर दिले आहे. सध्या ते पक्षाच्या बाभारत जोडो न्याय यात्रेसोबत राजस्थानातील धौलपूर येथे आहेत. त्यांना नोटीशीची विचारणा केल्यावर ते म्हणाले की, आम्हाला नोटीस मिळाली असून आम्ही त्याचे उत्तर देऊ, काँग्रेसच्या माध्यम विभागाची जबाबदारी रमेश यांच्याकडे असल्यामुळे तर खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे गडकरींनी या दोघांना नोटीस पाठवली आहे.
जयराम रमेश म्हणाले की, त्यांनी नोटीस वाचली असून त्याचे योग्य उत्तर दिले जाईल. त्यांचेच गडकरी) बोलणे, त्यांच्याच शब्दांचा आम्ही वापर केला आहे. आम्ही कोणती चूक केलेली नाही. गडकरी का अस्वस्थ आहेत हे मला समजत नाही. बिचारे अस्वस्थ आहेत आणि आम्ही त्यांना उत्तर देऊ. मात्र, काँग्रेसने हा व्हिडिओ त्या बोलण्याचा पुढचा मागचा संदर्भ वगळून तयार करत तो शेअर केला आहे असे गडकरी यांचे म्हणणे आहे.
गडकरींचे काय आहे म्हणणे ?
काँग्रेसने १९ सेकंदांचा तो व्हिडिओ तत्काळ आपल्या हँडलवरून हटवावा. तसेच दोन्ही नेत्यांनी तीन दिवसांच्या आत लेखी स्वरूपात माफी मागावी, त्यांनी तसे केले नाही तर आपल्याला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. भारतीय जनता पार्टीत कलह निर्माण व्हावा याकरताच हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असल्याचे गडकरींनी पाठवलेल्या नोटीशीत म्हटले आहे.
का झाला आहे गोंधळ ?
नितीन गडकरी यांनी अलिकडेच लल्लनटॉप या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी देशातील स्थितीबाबत मते मांडली होती. काँग्रेसने याच मुलाखतीतील १९ सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात आज गाव, मजुर, शेतकरी दुःखी आहेत. गावांमध्ये चांगले रस्ते नाहीत, पिण्यासाठी चांगले पाणी नाही, चांगली रुग्णालये नाहीत, चांगल्या शाळा नाहीत असे गडकरी स्वतः सांगत असल्याचे दिसते आहे.




