राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटातील लोणावळ्यातील १०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.
पवार म्हणाले, देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे.
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ‘सामना’चे (शिवसेनेचं मुखपत्र) संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही.



