पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकतेच श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांचा मतदारसंघात थांग पत्ता नाही. त्यांच्यावर काय बोलू असं म्हणत टीका केली होती. यावर संजोग वाघेरे यांनी पलटवार करत सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी बोलू नये, असा टोला लगावला आहे. संजोग वाघेरे पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाघेरे म्हणाले, श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. ते जर मतदारसंघातील नागरिकांना ओळखत नसतील तर ही शोकांतिका आहे. त्यांना समजलं पाहिजे की ते कुणाबद्दल बोलत आहेत. कारण मी त्यांच्या मतदारसंघात राहतो. माझं मूळ गाव, जन्मभूमी आणि कर्मभूमी ही पिंपरी गाव आहे. ते चुकीचं बोलत आहेत, असं म्हणत संजोग वाघेरे यांनी बारणे यांना खोचक टोला लगावला. पुढे ते म्हणाले, ते कुठल्या पक्षातून कुठल्या पक्षात आले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी सत्तेसाठी पक्ष सोडला. आम्ही तत्वांसाठी पक्ष सोडला. आम्ही सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेलो नाहीत.




