- शासनाच्या उपमुख्य निवडणूक अधिका-यांकडून तक्रारीच्या पडताळणीचे आदेश
- नगर विकास प्रधान सचिव, सामान्य प्रशासन अपर मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश
पिंपरी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे काम पाहणा-या आणि तीन वर्ष कालावधी झालेल्या प्रति नियुक्तीवरील अधिका-यांच्या बदल्या करणे बंधनकारक आहे. मात्र, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न केल्याने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
शासनाच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आपच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन नगरविकास प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन अपर मुख्य सचिव यांना तक्रारीची पडताळणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
आम आदमी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रविराज काळे यांनी १ फेब्रुवारी २०२४ रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याबाबत केलेल्या तक्रारीची भारत निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल घेतली आहे.
त्या तक्रारी अर्जानूसार महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपमुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना पत्र पाठविले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन न करता निवडणूकीचे काम पाहणा-या सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना तीन वर्ष कालावधी झालेल्या अधिका-यांची बदली न केल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी सदरील तक्रारी अर्जाची तात्काळ तपासणी करुन आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे उप मुख्य निवडणूक अधिकारी योगेश गोसावी यांनी दिले आहेत.
‘आप’ ची काय होती तक्रार
भारत निवडणुक आयोगाने २१ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्रान्वये निवडणूक कामकाज पाहणा-या अधिका-यांना ३ वर्ष पुर्ण झालेत त्यांना मुळ जिल्हा म्हणजेच महसूल जिल्हा समजण्यात यावा, त्या अधिका-यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात, असे निर्देश दिलेले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या मर्जीतील अधिका-यांच्या बदल्या होऊ नयेत म्हणून निवडणुक कामकाज पाहणा-या अधिका-यांचा तात्पुरता पदभार निरस्त करत अन्य अधिका-याकडे सोपवला आहे.
तसेच आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी भारतीय निवडणुक आयोगाच्या निर्देशाचे पालन न करता निवडणुकीचे कामकाज करणा-याचे अधिका-यांचा तात्पुरता पदभार अन्य अधिका-याकडे सोपवून एकाच पदावर दोन अधिका-यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या.
त्यामुळे संबंधित आयुक्त शेखर सिंह यांची देखील योग्य ती चौकशी करत त्यांच्यावर देखील कडक कारवाई करावी. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, राज्य मुख्य आयुक्त, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी तक्रार केली होती.




