हिंजवडी : खोट्या कागदपत्रांच्या साह्याने मुळशीतील मुगावडे येथे प्लॉट विक्री करत एका ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक राहुल नहारसह तिघांवर फसवणूक आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१० पासून आतापर्यंत घडला आहे.
बांधकाम व्यावसायिक राहुल रसिकलाल नहार , कंपनीचे व्यवस्थापक साई केरकर आणखी एक अनोळखी व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथे राहणारे साबीर नजीर अहमद शेख या ग्राहकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६० (आयपीसी) च्या कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी एक्सार्बिया डेव्हलपर्स लिमिटेड (आधीचे नाव आयफल डेव्हलपर्स अँड रिएअल्ट्स लिमिटेड) याचे मालक राहुल नहार यांच्याकडून मुळशी तालुक्यातील मुगावडे गावातील ऑलम्पिया प्लॉटिंग स्कीमबाबत वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली. त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. त्यावेळी तक्रारदार यांना या स्कीमच्या मार्केटिंग व सेल्स टीमचे सुनील ओझा, चेतन ठक्कर, शैलेश दवे यांनी त्यांना स्कीमविषयी माहिती दिली. यानंतर तक्रारदाराने नहार यांची भेट घेतली असता त्यांनी ही स्कीम कायदेशीर असल्याचे सांगितले. सेल्स टीम व नहार यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने ७ हजार ६३५ चौरस फुटांचा प्लॉट खरेदी करण्याचे ठरवले. यानंतर ३० जुलै २०१० खरेदी देणार एक्सर्बीया डेव्हलपर्सचे मालक राहुल नहार यांच्या मार्फत कुलमुखत्यारधारक म्हणून योगेश नारायण निकम यांच्याकडून या प्लॉटचे ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’सह दुय्यम निबंधक मुळशी क्रमांक २ यांच्या कार्यालयात केले. त्या बदल्यात राहुल नहार यांना २६ लाख ५२ हजार ३०० रुपये वेळोवेळी रोख व धनादेश स्वरूपात तक्रारदाराने दिले. मात्र खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी नहार यांना खरेदीखत का करून देत नाही, असे वेळोवेळी विचारले असता त्यांनी कंपनीच्या नियमानुसार सुरुवातीला आम्ही ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’ करून घेतो व नंतर खरेदी खत करून देतो, असे सांगितले. या करारनाम्यानुसार नहार यांनी संबंधित प्लॉटचा ताबा दिला नाही, असे तक्रारीत म्हटलेले आहे.
तक्रारदार हे सन २०११ ते २०१७ या कालावधीमध्ये व्यवयासनिमित्त दुबई येथे होते. ते भारतात परतल्यावर त्यांनी नहार यांना ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’ करारनाम्याप्रमाणे खरेदीखत करून देण्याची विनंती केली असता नहार याने खरेदीखत करून देण्यास चालढकल करत वारंवार टाळाटाळ केली. परंतु शेख यांनी फारच आग्रह केल्यामुळे १ सप्टेंबर २०२१ रोजी सह दुय्यम निबंधक मुळशी क्रमांक २ यांचे कार्यालयात नहार यांच्यातर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता किशोर पांडुरंग हिदगावकर तर्फे अजिंक्य प्रमोद पलंगे यांच्याकडून ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’मध्ये नमूद केलेली जमीन खरेदी केली.
खरेदीखताप्रमाणे तक्रारदार यांनी मुळशीतील तहसीलदार कार्यालयात दप्तरी नोंद करण्यासाठी अर्ज केला असता या कार्यालयाने नहार यांनी तुकडेबंदीची रितसर परवानगी घेतली. परंतू शासनाच्या मंजुरीसाठी लागणारी रक्कम अदा केली नसल्याने प्लॉटची नोंद नामंजूर केली. यानंतर तक्रारदाराने ३० जुलै २०१० रोजीचे ‘ॲॅग्रीमेंट टू सेल’, त्यासोबत जोडलेले सातबारा, फेरफार, मंजूर नकाशा ही कागदपत्रे आणि १ सप्टेंबर २०२१ रोजी केलेले खरेदीखत, त्यासोबत जोडलेली कागदपत्रे सातबारा, मंजूर नकाशा, एनए ऑर्डर, इ.’ॲॅग्रीमेंट टू सेल’ कागदपत्रे पडताळून पाहिली असता सेलमध्ये त्यांना विकलेला प्लॉट क्रमांक ३६ होता.
खरेदीखतामध्ये नमूद केलेला प्लॉटचा क्रमांक ३६ (एन १) असा आढळून आला. त्याबाबत त्यांनी नहार व कंपनीचे मॅनेजर साई केरकर यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी दोन्ही प्लॉट एकच आहेत अशी खोटी माहिती दिली. त्यानंतर तक्रारदार यांनी विकत घेतलेला प्लॉट सध्याच्या बाजारभावाप्रमाणे १ कोटी ५० लाख रुपयांना एका महिलेला विकणार होते.
त्यामुळे त्या महिलेने शिवाजीनगर येथील बँक आयसीआयसीआय होम फायनान्स यांच्याकडे या मिळकतीची कागदपत्रे कर्ज मंजूर करून घेण्यासाठी दिली असता बँकेने या प्लॉटवर कर्ज मंजूर करता येत नसल्याचे सांगितले. कारण प्लॉटबाबत अकृशक वापराची परवानगी जोडलेली आहे.
ती व्यवसाय वापरासाठी असून त्यामध्ये रहिवासी वापराची कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे आढळून आले. त्यामुळे त्यांना मिळकत महिलेस विकता न आल्याने त्यांचे कधीही भरून न निघणारे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नहार यांच्यासह अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : विजय कुंभार
महाराष्ट्राची अस्मिता “सह्याद्री” पर्वतरांग विद्रुप करणारे बांधकाम व्यावसायिक राहुल नहार आणि त्यांना पाठीशी घालणारे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे तसेच अन्य संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. नहार यांनी पुन्हा ना विकास जमिनीचे प्लॉटिंग करून त्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे पुण्याचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी बोलताना सांगितले.




