पिंपरी : हिवाळ्याचा समारोप काही दिवसावरच येऊन ठेपला आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताना उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शहरातील नागरिकांची पावले हळूहळू जलतरण तलावाकडे वळू लागली आहेत. महापालिकेचे विविध भागांतील १३ जलतरण तलावांपैकी आठच तलाव सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने केशवनगर, संभाजीनगर, कासारवाडी, पिंपरी वाघेरे, यमुनानगर, पिंपळेगुरव, नेहरुनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागांत १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने पोहण्यासाठी जलतरण तलावांवर गर्दी होऊ लागली आहे. महापालिकेच्या जलतरण तलावावर एक तास पोहण्यासाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येते. तसेच मासिक पास ५०० रुपये, तिमाहीसाठी १२०० तर वार्षिक ४५०० रुपयापर्यंतचे पास देण्यात येतात. त्यामुळे पालिकेच्या तलावावर उन्हाळ्यात प्रचंड मोठी गर्दी असते. मात्र, महापालिकेचे पाच तलाव अद्याप कुलूपबंद आहेत त्यामुळे त्याचा ताण इतर तलावावर होत आहे.
हे पाच तलाव आहेत बंद…..
थेरगाव, मोहननगर, यमुनानगर, निगडी आणि भोसरी येथील जलतरण तलावाची कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना जास्त पैसे मोजून पोहण्यासाठी खाजगी तलावावर जावे लागत आहे.
नेहरुनगर मधील कै. अण्णासाहेब मगर, पिंपळेगुरव येथील कै. काळूराम जगताप, पिंपरी वाघेरे, कासारवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वडमुखवाडीतील श्री संत ज्ञानेश्वर, केशवनगर येथील कै. वस्ताद बाळासाहेब गावडे, सांगवीतील बाळासाहेब शितोळे आणि संभाजीनगर येथील साई हे आठ तलाव सुरू आहेत, तर थेरगावातील खिंवसरा पाटील, मोहननगर येथील राजश्री शाहू महाराज, यमुनानगर येथील मीनाताई ठाकरे, प्राधिकरणातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि भोसरीतील कै. बाळासाहेब लांडगे हे पाच तलाव बंद आहेत. स्थापत्यविषयक कामामुळे दोन तलाव बंद आहेत. एक तलाव आठ दिवसांत सुरू होईल. तर, दोन तलावांच्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करून कामाचा आदेश देण्यात येणार आहे.
– मिनीनाथ दंडवते उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका




