पिंपरी : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचे गुराळ अद्याप संपलेले नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड व शिरूरच्या दोन उमेदवारांची घोषणा केली. लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करताना त्यांनी मावळ लोकसभेत महायुतीचा धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार उभा राहील असे सांगत मावळ लोकसभा ही महायुतीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाणार हे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी पुणे शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत महायुती मधील घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड लोकसभेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उमेदवार असतील असे जाहीर केले. त्यानंतर मंचर येथे आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरवापसी सोहळ्यात बोलताना पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आणावेत असे आवाहन केले.
यावेळी बोलताना शिरूर व बारामती लोकसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हावरती मतदान करावे. पुणे लोकसभेसाठी कमळ चिन्ह व मावळ लोकसभेसाठी धनुष्यबाण हे चिन्ह राहील असे म्हटले आहे. मावळ लोकसभेसाठी भाजपने कंबर कसली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी अद्याप जाहीर न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. अजितदादांच्या वक्त्यव्याने मावळ तालुक्यात महायुतीचा प्रबळ दावेदार श्रीरंग बारणे हे धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार राहणार हे नक्की झाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर धनुष्यबाणाचाच उमेदवार असल्याने मशाल व धनुष्यबाण यांच्यातच सामना होणार हे नक्की आहे.




