
मोबाईल फोडला म्हणून तरुणाने एकाच खोलीत राहणाऱ्या सहकारी मित्राचा गळा आवळून आणि लोखंडी तव्याने मारून खून केला. ही घटना 28 मार्च रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे इंगळे येथे घडली. खून केल्यानंतर आरोपी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखा युनिट तीनने मध्य प्रदेश मधील दमोह जिल्ह्यातून अटक केली आहे.
रामसिंग सुलतानसिंग गोंड (वय 30, रा. रेयाना ता. जि. दमोह, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कालू मंगल रकेवार (वय 23, रा.महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. पथरीया, ता. जि. दमुही, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कालू याचा भाऊ पप्पू मंगल रकेवार यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.




