पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा शहरातील साडेतीन लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे. या करदात्यांना तब्बल 24 कोटी 32 लाख रुपयांची कर सवलत मिळाली आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.
शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळा जमीन, मिश्र यासह विविध अशा 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. 2023-24 या आर्थिक वर्षात 6 लाख 25 हजार मालमत्तांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. गतवर्षी या विभागाने 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.
महापालिकेच्या वतीने करदात्यांना आगाऊ कर भरल्यास, ऑनलाईन आगाऊ भरणा केल्यास, महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास करात सवलत, दिव्यांग, माजी सैनिक, शैर्य पदक धारक, पर्यावरण पूरक सोसायटी, पर्यावरण पूरक खासगी शैक्षणिक संस्था अशा विविध प्रकारे करामध्ये सवलत देण्यात येते.
16 हजार 132 सदनिका धारकांना
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबवून पर्यावरणासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या शहरातील 16 हजार 132 सदनिका धारकांना तब्बल 71 लाख रूपयांची घसघशीत अशी मिळकत कराच्या सामान्य करातून सवलत
मिळाली आहे.
रोख अथवा धनादेशाद्वारे आगाऊ कर भरणा करणाऱ्या 86 हजार 252 मालमत्ता धारकांना 3 कोटी 45 लाख, ऑनलाईन आगाऊ कर भर भरणा करणाऱ्या 2 लाख 45 हजार 253 जणांना सर्वाधिक 15 कोटी 62 लाख, मालमत्ता महिलांच्या नावावर असल्यामुळे 12 हजार 559 महिलांना 2 कोटी 14 लाख, 1257 दिव्यांगांना 3 लाख, 3 हजार 452 माजी सैनिकांना 2 कोटी 8 लाख रुपयांची भरघोस ( PCMC) अशी करातून सवलत मिळाली आहे.




