पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोड प्रकल्पासाठी मागविण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी दोन वेळा वाढविलेली मुदत अखेर मंगळवारी (ता. १६) संपुष्टात येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत १९ कंपन्यांनी निविदा भरल्या असून, त्यामध्ये सिंगापूर, अमेरिका यांच्यासह चार परदेशी कंपन्यांनी रस्त्याच्या कामासाठी रस दाखविला आहे. रिंगरोड हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यास ‘विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात आला आहे.
या रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यासाठी पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आले आहे. एकाच वेळी पाच टप्प्यांतील काम सुरू करण्याचा मानस ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पूर्व रिंगरोडच्या मार्गिकेचेदेखील भूसंपादन गतीने सुरू आहेत. रिंगरोडसाठी ‘एमएसआरडीसी’ने यापूर्वीच ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती. आता प्रत्यक्ष काम देण्यासाठी ठेकेदार कंपनी नेमण्यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
१७ जानेवारी ते १ मार्चपर्यंत निविदा भरण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु या मुदतीत प्रतिसाद कमी मिळाल्याने निविदा भरण्यास २६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात होती. या मुदतीत आणखी काही कंपन्या निविदा भरल्या, तर काही कंपन्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केल्याने १६ एप्रिलपर्यंत मुदत वाढविण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी संपुष्टात येत आहे.
वर्कऑर्डर आचारसंहितेनंतर
१९ कंपन्यांनी निविदा भरल्या असून, भारतीय कंपन्यांबरोबरच सिंगापूर, अमेरिका आणि अन्य दोन देशांतील कंपन्यांनी या कामासाठी निविदा भरल्या आहेत. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे.
आचारसंहितेच्या काळात निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर दाखल निविदा उघडण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या छाननीचे काम पूर्ण करण्यात येईल. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर प्रत्यक्ष कामाचे आदेश दिले जातील, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.
पूर्व आणि पश्चिम भागातील रिंगरोडच्या कामासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. मंगळवारी (ता. १६) निविदा भरण्याची मुदत संपुष्टात येत असून, आतापर्यंत १९ ठेकेदार कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. देश-विदेशातून या निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. आचारसंहिता लागू असल्यामुळे निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर त्या उघडून छाननीचे काम करण्यात येणार आहे.
– एमएसआरडीसी
रिंगरोडवर काय असणार?
बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल
१२२ किलोमीटर रिंगरोडची एकूण लांबी
११० मीटर रिंगरोडची एकूण रुंदी
७१.३५ किमी पूर्व रिंगरोडची लांबी
सुमारे ८० टक्के पश्चिम भागातील भूसंपादन
सुमारे ७० टक्के एकूण भूसंपादन
६५.४५ किमी पश्चिम रिंगरोडची लांबी
पश्चिम रिंगरोड टप्पे
पहिला टप्पा : १४ कि.मी.
दुसरा टप्पा : २० कि.मी.
तिसरा टप्पा : १४ कि.मी
चौथा टप्पा : ७.५० कि.मी.
पाचवा टप्पा : ९.३० कि.मी.
भोर, हवेली, मुळशी, मावळ या तालुक्यांतून जाणार
पूर्व रिंगरोड टप्पे
पहिला टप्पा : ११.८५ कि.मी.
दुसरा टप्पा : १३.८0 कि.मी.
तिसरा टप्पा : २१.२० कि.मी.
चौथा टप्पा : २४.५० कि.मी.
मावळ, खेड, हवेली, पुरंदर, भोर तालुक्यांतून जाणार आहे.



