
पुणे – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होत आहे. २०१९ पासून राज्यातलं राजकारण नागमोडी वळणं घेत असल्याने कोण कोणाचा मित्र, आणि कोण कोणाचा शत्रू हेच कळायला मार्ग नाही. त्यामुळे, राजकीय विरोधक हे सोबती झाले तर, सोबती हे विरोधकाच्या भूमिकेत आमने-सामने आले आहेत.
मावळमधून खासदार श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात आहेत. गतवर्षी त्यांनी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. मात्र, यंदा तेच पार्थ पवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी उतरणार असल्याचे दिसून येते. कारण, उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण पार्थ पवार यांनाही निमंत्रण देणार असल्याचे बारणे यांनी म्हटलं आहे. तर, महायुतीचे दिग्गज नेते येणार असल्याने अजित पवार हेही उपस्थित राहतील का, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे २२ एप्रिल रोजी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. श्रीरंग बारणे यांनी दोनवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला असून यंदा विजयाची हॅट्टीक करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळेच, महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ते अर्ज दाखल करउन असून गत निवडणुकीतील त्यांचे प्रतिस्पर्धी पार्थ पवार यांनाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे, ज्यांच्याकडून पराभव झाला त्यांच्याच प्रचारासाठी पार्थ पवार येणार असल्याची चर्चा मावळ मतदारसंघात आहे. तर, महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी राष्ट्रवादीकडून अजित पवार येतील की सुनिल तटकरे याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र, पार्थ पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरणार असून पार्थ पवार येतील की नाही हे २२ मार्च रोजीच समजणार आहे.




