पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरात विविध रस्त्यांवर ७५ किलोमीटर अंतराचे ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे. आणखी काही रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’ बनविण्यात येणार आहेत. मात्र, हे ट्रॅक सुरक्षित आणि सलग नसल्याने सायकलस्वारांना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. अनेकदा या मार्गावर सायकलस्वारांचे अपघात झाल्याचेही प्रसंग घडले आहेत.
शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनविण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कमी रूंदीचे रस्ते आहेत, तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. शहरात विविध रस्त्यांवर एकूण ७५ किलोमीटर अंतराचे ‘सायकल ट्रॅक’ आहेत. हे ‘सायकल ट्रॅक’ महापालिका; तसेच ‘स्मार्ट सिटी’ कंपनीने केले आहेत.
‘सायकल ट्रॅक’ एकसलग नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. सायकल ट्रॅकवर मध्येच झाड, बाके, कठडा, डिपी बॉक्स, दिव्याचा खांब, पार्क केलेले वाहन, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, नामफलक, तुटलेले चेंबरचे झाकण, तुटलेले केबल, उघड्या वीजवाहक केबल, अतिक्रमण असे असंख्य अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. परिणामी, सायकल ट्रॅकसाठी केलेला कोट्यवधी खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. त्या कारणांमुळे ‘सायकल ट्रॅक’चा कोट्यवधीचा खर्च वाया गेल्याचे स्पष्ट होत आहे.




