पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा भाजपला मिळावी, यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व मावळचे माझ्या आमदार बाळा भेगडे तीव्र इच्छा होते. येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती. बारणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरेही पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक असल्याने सुरुवातीला बारणे यांच्यासाठी निवडणूक सोपी वाटत होती. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती व बारणे यांच्याविषयी दहा वर्षांतील नाराजी याचा फायदा वाघेरेंना होईल, असे चित्र मतदानातून दिसून आले.
मतदारांपर्यंत पोहोचविण्याची कसरत
शिवसेनेमधून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर बारणे शिंदेंसोबत गेले, पण त्यांच्याबरोबर शिवसेनेतून मोजकेच नेते गेले. परंतु, चिंचवडला भाजपचे आमदार अश्विनी जगताप यांनी पोटनिवडणुकीत १ लाख ३५ हजार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यानी जवळपास १ लाख मतदान घेतलें. त्यामुळे चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ताकद आहे.
तरीही तेरा मे रोजी झालेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला आहे. चिंचवडमधील बहुतांश भागात बारणे यांना प्रचारादरम्यान पोहोचता आले नाही की पोहोचू दिले नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे वाघेरे अनेक वर्षे राष्ट्रवादीत असल्याने त्यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. त्यातच नात्यागोत्याच्या राजकारणात पिंपरी चिंचवड शहरातील राजकारण मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रकर्षाने जाणवत होतं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणारा चिंचवड विधानसभा मतदार संघ या वेळेला कोणाला झुकते माप देणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.



