हिंजवडी : आयटी पार्क हिंजवडी परिसरात होर्डिंगबाबत अद्याप ठोस नियमावली व धोरण नाही. या भागातील अनेक पेट्रोल पंपांलगत व उंच इमारतींवर महाकाय बेकायदा होर्डिंग्जचे जीवघेणे पध्द्तीने उभारण्यात आले आहे. याला पायबंद घालण्याऐवजी खतपाणी घालण्याची ‘पीएमआरडीए’ प्रशासनाची (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या भागात अनेक होर्डिंग आयटीयन्ससह स्थानिक नागरिकांसाठी धोकादायक असल्याने प्रशासन घाटकोपरची पुनरावृत्ती होण्याची वाट बघतेय का? असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. ‘होर्डिंग कितीही मोठे करा, मात्र आम्हाला कर द्या,’ अशी भूमिका असल्याने पीएमआरडीए प्रशासन महाकाय धोकादायक होर्डिंग्जला पाठबळ देत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.
संपूर्ण हिंजवडी आयटी परिसरात सुमारे तीनशेहून अधिक विनापरवाना धोकादायक होर्डिंग्ज आहेत. प्रचंड वर्दळीच्या चौकांत असलेले होर्डिंग्जचे सांगाडे मोठ्या अपघाताला निमंत्रण देत आहेत. यापैकी काही होर्डिंगधारकांना चार महिन्यांपूर्वी केवळ नोटीस बजावल्या. ‘होर्डिंग नोंदणीकृत करा अथवा ते काढून घ्या’, अशा सूचना करण्याचे केवळ सोपस्कार पीएमआरडीए करीत आहे. तीन महिने उलटूनही अद्याप कारवाईची हिंमत त्यांनी केलेली नाही.




