- उपमुख्यमंत्री अजित पवार व आयुक्तांना मिळकतकर सवलत व शास्तीकरात माफी देण्यासाठी मागणी
पिंपरी : तळवडे रुपीनगर या परिसरात रेडझोन जाहीर झाल्यामुळे कोणताही शाश्वत विकास होत नाही. नागरीकांना दर्जेदार सुविधा महानगरपालिकेमार्फत मिळत नाहीत. तथापि, पालिकेतील इतर गावांच्या मिळकतकराप्रमाणेच तळवडे रुपीनगर व परीसरातील मिळकतींना महापालिकेने मिळकत कर लागू केलेला आहे. तसेच सद्या नव्याने मिळकत कराबाबत सर्वेक्षण सुरू असून त्यामध्ये देखील शहरातील इतर भागाप्रमाणेच मिळकत कर लागू करण्याचे महापालिकेचे नियोजन दिसून येत आहे.
तळवडे रुपीनगर परिसरातील कोणतेही आरक्षण अद्यापपर्यंत विकसित झालेले नाही. विकास योजनेतील रस्ते विकसित झालेले नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न जटील झाला आहे. शहराच्या विकासाकरिता या भागातील रस्त्याचे भूसंपादन करत असताना जमीनींचे रेडीरेकरचे दर अत्यंत कमी असल्याने शेतकयांना टी डी आर (नुकसान भरपाई) रेडीरेक्ररचे दराच्याही ०.५० या प्रमाणात मिळत आहे. मात्र मिळकतकर शहरातील इत्तर भागातील मिळकतीप्रमाणेच लागू केला जात आहे.

हा तळवडे रुपीनगर रेडझोन बाधित परिसरातील नागरीकांवर अन्याय करणारी आहे. शहरातील इतर भागात पालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे भागातील नागरीक स्वयंप्रेरणेने मिळकत कर आकारणीस सहकार्य करीत नाहीत. परिणामी महानगरपालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार करयोग्य मुल्य ठरविणेकामी वापरले जाणारे दर ठरविणेचे अधिकार मा. आयुक्त यांना आहेत. तरी तळवडे रुपीनगर रेडझोन बाधित भागातील मिळकतींना शहराच्या इतर भागातील मिळकत कराच्या ५० टक्के दराने मिळकत आकारणी करावी. तसेच या भागातील नागरीकांना शास्ती करातून मुक्तता मिळणेकरीता नविन मिळकतींच्या नोंदी दिनांक १/०४/२०२२ करण्यात याव्यात. यामुळे ०४/०३/२०२३ च्या अवैध बांधकाम शास्तीकराच्या शासन निर्णयाचा फायदा तळवडे रुपीनगर परिसरातील नागरिकांना होईल.
याबाबत निर्णय घेवून महापालिकेने नागरीकांना आश्वासित करुनच मिळकतींचे सर्वेक्षण करावे. यामुळे तळवडे व रुपीनगर परिसरातील जास्तीत जास्त नागरीक स्वतः मिळकत कर सर्वेक्षणास सहकार्य करुन मिळकत कर भरतील. अशी मागणी माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी केली आहे.




