लातूर : शहरातील रहिवासी असलेल्या सार्थक व स्वप्नील सौदागर चव्हाण या जुळ्या भावंडांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्यांनी गुणही जुळेच मिळवले आहेत. दोघा भावंडांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.
लातूर शहरातील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात इयत्ता दहावीच्या वर्गातील सार्थक व स्वप्नील चव्हाण या जुळ्या भावंडांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. सार्थक याने बुद्धिबळ, तर स्वप्नील याने संगीत कलाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना विशेष गुणांचा लाभ मिळाला.
यामध्ये सार्थकला ९ आणि स्वप्नीलला १० अतिरिक्त गुण मिळाले आहेत. दोघा भावांना ‘आयआयटी’चे शिक्षण घेण्याची इच्छा असून, ते तयारीला लागले आहेत. वडील माजी मुख्याध्यापक, तर आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या या जुळ्या भावंडांचे कौतुक होत आहे.



