
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात आता अनेक नवी नावं समोर येऊ लागली आहेत. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबांपाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. अल्पवयीन आरोपीने ज्या बार आणि पबमध्ये मद्यप्राशन केलं. त्या पब, बारचे मालक आणि व्यवस्थापकांवर कारवाई झाली आहे. आता या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत.
अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे, अजित पवारांचे विश्वासू तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांसह त्यांच्या पक्षावर आरोप केले आहेत. यापाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या अपघात प्रकरणावर भाष्य केलं असून यात राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं वक्तव्य केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या तरी मंत्र्याने फोन केला होता, अशी माहिती आमच्या कानावर आली आहे. विशाल अग्रवाल (अल्पवयीन आरोपीचे वडील) या बांधकाम व्यवसायिकाची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे? कोणकोणत्या मंत्र्यांचे त्याच्या कंपनीत पैसे गुंतलेले आहेत? कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्याचे हितसंबंध आहेत? याची चौकशी व्हायला हवी. ती चौकशी करत असताना अपघाताच्या रात्री त्याने कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता हे तपासायला हवं.



