
पुणे : लष्कराच्या सहकार्याने काश्मीरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारु, अशी घोषणा ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी केली.
‘विश्व हिंदू मराठा संघा’च्यावतीने स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डेक्कन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुनीत बालन म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा या युगात झालेला नाही. मी भारतीय लष्करासमवेत काश्मीरमध्ये काम करतो. आपले भारतीय सैनिक जेंव्हा जेंव्हा युद्धाला जातात तेंव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम डोळ्यासमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणाच आपल्या शूर जवानांना लढण्यासाठी मोठे बळ देत असते.’’ काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याठिकांणी रोज सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पुतळ्याची आरती केली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




