पिंपरी : ऑनलाईन टास्क आणि शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सायबर चोरटे वेगवेगळे आमिष दाखवून लोकांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक करतात. अशाच एका प्रकरणातील फसवणुकीची रक्कम घेण्यासाठी बँक खाते उपलब्ध करुन देणाऱ्या एकाला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या आरोपीच्या खात्यावर मागील काही दिवसांत तब्बल अडीच कोटींचा व्यवहार झाला असून या खात्यासंदर्भात देशभरातून 72 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
लक्ष्मण अमृत गेजगे (रा. पौड रोड, पिरंगुट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड येथील महिला व्हॉट्सअॅप बघत असताना तिला पार्टटाईम जॉबसाठी मेसेज आला. महिलेला नोकरीची गरज असल्याने नोकरी संदर्भात विचारणा केली असता आरोपीने त्यांना शेअरचाट व्हिडीओ लाईक आणि शेअर करण्यास सांगितले. तसेच तीन शेअरचाट व्हिडीओ लाईक केल्यानंतर फिर्यादी यांना 120 रुपये मिळतील असे सांगितले.




