आळंदी (वार्ताहर): मुंबई येथील होर्डिंग्ज दुर्घटनेची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या आदेशानुसार आळंदी शहरातील सर्व 25 अनाधिकृत होर्डिंग्ज नगरपरिषदेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने निष्कासित करून भुईसपाट केल्या आहेत.
आळंदी नगरपरिषद कार्यालया मार्फत परवानगी न घेतलेल्या होर्डिंग्ज तत्काळ निष्कासित करणे बाबत मुख्याधिकारी केंद्रे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागास आदेशित केले होते.त्यानुसार आळंदी नगरपरिषद अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली मागील 8 दिवसांपासून शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याची नगरपरिषदेची मोठी कारवाई सुरू होती.
जमिनीवर असणाऱ्या होर्डिंग्ज क्रेन च्या साहाय्याने व घरावर असणाऱ्या होर्डिंग्ज गॅस कटर च्या मदतीने नियोजन बद्ध पद्धतीने काढण्यात आल्या. होर्डिंग्ज निष्कासित करण्याची कार्यवाही सुरू असताना आळंदी नगरपरिषद कर्मचारी हे सदर ठिकाणी उपस्थित राहून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करताना आढळून आले.
शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज निष्कासित करण्याच्या कारवाईत आळंदी नगरपरिषद मार्फत विभागप्रमुख सचिन गायकवाड,अरुण गुंडरे,सोमनाथ वैरगे,माऊली सोळंखे,राहुल सोळंखे,उद्धव मते,दिग्विजय तौर यांनी विशेष परिश्रम घेतले.नजीकच्या पावसाळा,वादळ,वारे विचारात घेता अजस्त्र आकाराच्या उंच लोखंडी होर्डिंग्ज काढून टाकण्याच्या आळंदी नगरपरिषदेच्या कारवाईचे आळंदी करांकडून स्वागत करण्यात आले आहे.



