पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या न्यू थेरगाव रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाने निर्धारित केलेल्या २७ हजार ६२० वेतनाऐवजी केवळ १६ हजार १०० रुपये मासिक वेतन दिले जात आहे. याविरोधात कामगारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे चिडलेल्या सुरक्षा रक्षक विभागातील नॅशनल सिक्युरिटी सर्विसेस ठेकेदाराने सुरक्षारक्षकांच्या पगारातून दर महिन्याला तीन दिवसांचा पगार कपात करण्यास सुरुवात केली आहे.
निवेदनात भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन या संघटनेचे अध्यक्ष महेंद्र गरुड यांनी म्हटले आहे की, सुरक्षा रक्षकांनी जिल्हा सुरक्षा मंडळात नोंदणी केली व भारतीय सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन (इंटक) या संघटनेचे सभासद झाले. न्यू थेरगाव रुग्णालयात महापालिकेने नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी ठेकेदार मे. नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे चिडून जाऊन, ठेकेदाराने महिन्याला तीन दिवसांचा पगार कपात करायला सुरवात केली.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने सुरक्षारक्षकांचा मासिक पगार २७ हजार ६२० रुपये निर्धारित केला आहे. मात्र, ठेकेदार त्यांना १६ हजार १०० रुपये देत आहे. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा तीन दिवसांचा पगार कपात करायला सुरवात केली. आर्थिक पिळवणूक करत आहेत. कमी दिलेले वेतन व वेतनातून केलेली कपात अन्यायकारक आहे. याबाबत विचार करून, बैठक लावावी, वेतन दराबाबत योग्य ते आदेश द्यावेत व त्यांचा कपात केलेला पगार त्यांना मिळवून द्यावा, अशी मागणी कामगार संघटनेने कामगार उपायुक्तांकडे केली आहे.
- महिला सुरक्षारक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
- राजीनामा देण्यासाठी वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याने महिला
- सुरक्षारक्षकाने फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार महापालिकेच्या न्यू थेरगाव रुग्णालयात बुधवारी (ता. ५) रात्री नऊच्या सुमारास घडला. पीडित महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस या सुरक्षारक्षक एजन्सीच्या सुपरवायझरसह अन्य दोघांविरोधात वाकड पोलिसांत अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपरवायझर दीपक वाघ यांच्यासह दोन कर्मचारी प्रशांत खंडाळे, राणी चालखे (वय व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेली माहिती अशी, संबंधित महिला नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस या एजन्सीमार्फत न्यू थेरगाव रुग्णालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांची पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात बदली झाली होती. मात्र, बदली होऊनही त्या तिकडे रुजू होत नव्हत्या.
यावरून सुपरवायझर वाघ व अन्य दोन आरोपींनी तिला फोनवरून वारंवार राजीनामा देण्यासाठी धमकी दिली. स्टॅम्पपेपरवर राजीनामा देण्यासाठी दबाव आणला, मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून त्या महिलेने राहत्या घरी फिनेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, महापालिकेच्या सुरक्षारक्षक विभागाचे मुख्य अधिकारी जरांडे यांनी प्रतिक्रिया साठी वारंवार फोन करूनही फोन घेतला नाही.




