उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामतीत रंगला होता. मात्र मैदानाबाहेरची लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती. या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली आहे. कारण सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत. हा निकाल आपल्याला अनपेक्षित होता, पण आम्हीच कमी पडलो असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अशात सुप्रिया सुळे या विजयाच्या सभा घेत आहेत. खडकवासला या ठिकाणी त्यांनी घेतलेली सभा, रोहित पवारांना दिलेला सल्ला सगळं चर्चेत आहे.

 

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 

“कार्यकर्त्यांचा इतका उत्साह आहे की मला वाटतं आहे मी पहिल्यांदाच लोकसभा निवडून आले. ही निवडणूक सगळ्यांसाठीच नक्की वेगळी होती. आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी निश्चय मनात पक्का केला आहे. खडकवासला भागात असेही लोक आहेत ज्यांनी अर्धा प्रचार माझा केला आणि अर्धा विरोधकांचा केला. असे खूप लोक आहेत, मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा वाईट वाटायचं पण आता काही वाटत नाही. ११ महिन्यांमध्ये बरीच गंमतजंमत झाली आहे. कुणी मिर्झापूर वेबसीरिज पाहिली असेल तर सांगते, अशी सीरिज बारामतीवर केली तर ती मिर्झापूर पेक्षा जास्त डेंजरस होणार आहे.” असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.