
इंदापुर : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपला आहे. आता पुढच्या काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी मंत्री आणि भाजपचे नेते यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या अॅक्टिव्ह झाल्या आहेत. भाजपकडून इंदापुरात विधानसभेची तयारी सुरु झाली आहे.
इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग
बारामती लोकसभेची निवडणूक संपताचं इंदापूरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी शहरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयास भेट दिली आहे. यावेळी त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत राजकीय घडामोडींचा आढावा घेतला. या निमित्तानं इंदापूरात भाजपाने विधानसभेची तयारी सुरु केल्याची चर्चा सुरु आहे.




