नाशिक : गेल्या दोन ते दिन दिवसांपासून महाराष्ट्राच्या वातावरणात बदल होत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असून राज्याच्या विविध ठिकाणी पाऊस हजेरी लावत आहे. नाशिक जिल्ह्यातदेखील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून काल (दि. 08) दिंडोरी तालुक्याला पावसाने झोडपले. तर आज सप्तशृंगी गडावर जोरदार पावसाने हजेरी लावली.
दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथील डाळिंब बागेत पाणी साचल्याचे दिसून आले. पहिल्याच पावसाने दिंडोरीत पूर सदृश्यस्थिती पाहायला मिळाली. नदी-नाल्यांना पूर आल्याने शेतकरी सुखावला आहे. तासाभराच्या पावसाने दिंडोरीत 1.7 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. तर दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
सप्तशृंगी गडावर जोरदार पावसाची हजेरी
आज नाशिकच्या सप्तशृंगी गड येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह ग्रामस्थांची एकच धावपळ उडाली. त्यातच गडाच्या पहिल्या पायरीच्या पायथ्याशी असलेली ड्रेनेज पाईपलाईन बंद झाल्याने परिसरातील दुकाने पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.



