
पुणे : देशात भाजपप्रणित एनडीए ने २९२ जागा जिंकल्यानंतर आज नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. शपथविधीला महाराष्ट्रातील ६ ते ७ खासदारांची नावे समोर आली आहेत. त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली आहे. पुण्यातून खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला होता.
महापौर ते खासदार असा प्रवास करणारे मुरलीधर मोहोळ मोदींच्या मंत्रिमंडळात जाणार आहेत. यानिमित्ताने मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भेट घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील खासदारांचे कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे. मोहोळ आणि खडसे यांच्यासारख्या तरुण खासदारांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रात अनुभवी लोकांना मंत्री होण्याची संधी मिळालीये. असे त्यांनी सांगितले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना चितपट केले.




