
पिंपरी : स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लागली. यावेळी निवडणूक लढवण्यावरून जगताप कुटुंबात अंतर्गत वाद समोर आले होते. यावेळी एक पाऊल मागे येत शंकर जगताप यांनी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना निवडणूक लढवण्याची संमती दिली. आता पुन्हा चिंचवड विधानसभेवरून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यात चढाओढ लागली आहे. त्यातच अश्विनी जगताप यांनी आपणच निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्याने पुन्हा जगताप कुटुंबीय गृहकलह निर्माण होणार का? असा प्रश्न चिंचवड मतदार संघातील नागरिकांना वाटत आहे.
शंकर जगताप यांनी उघडपणे चिंचवड विधानसभेवर दावा करत इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यावर आज अश्विनी जगताप यांनी प्रत्युत्तर देत चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे. दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या त्या राजकीय उत्तराधिकारी असल्याचं देखील अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेची पोट निवडणूक जिंकत अधोरेखित केले आहे.
अश्विनी लक्ष्मण जगताप म्हणाल्या, चिंचवड विधानसभेवर भाजपची ताकद आहे. महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटते. दिवंगत लक्ष्मण जगताप हे चार वेळेस चिंचवड विधानसभेतून निवडून आलेले आहेत. तिथं आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये भाजपकडे राहणार आहे.
दिर, शंकर जगताप यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. बोलण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. विधानसभा लढवण्यावर मी ठाम आहे. पोटनिवडणुकीच्या वेळी कुठलीही चर्चा झाली नाही. उलट, परिवारातील प्रत्येकाने पोटनिवडणुकीत झोकून देऊन ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले. लोकसभेपूर्वीच माझी विधानसभेची तयारी सुरू असून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, असेही त्या म्हणाल्या.
नक्की कोणते जगताप निवडणुकीच्या मैदानात….
लक्ष्मण भाऊंना मानणारा मोठा मतदार चिंचवड विधानसभेत आहे. भाऊंच्या निधनानंतर भाऊंना श्रद्धांजली म्हणून अश्विनी ताईंना चिंचवड मधील नागरिकांनी विजयाची माळ गळ्यात घातली. भाऊंच्या नंतर चिंचवड विधानसभेसाठी त्यांचे बंधू व भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप हेही इच्छुक होते. पोटनिवडणुकी वेळी एक पाऊल मागे घेत त्यांनी पुढील निवडणुकीवरती आपला दावा कायम ठेवला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड विधानसभेसाठी शंकर जगताप प्रबळ इच्छुक आहेत. त्यांच्या याच आशेवर घरातूनच पायबंद घातला जात आहे का? असं प्रश्न नागरिकांना वाटत आहे.
चिंचवड विधानसभेसाठी जगताप कुटुंबीय वगळता ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनीही दावा ठोकला आहे. मात्र मागील काही निवडणुका पाहता भाजपकडून चिंचवड विधानसभेसाठी जगताप कुटुंबियातील उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येईल असे दिसून येते.




