
चंद्रपूर : माझ्या लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघाचे तिकीट मीच वाटणार आहे, असं वक्तव्य नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छूक असलेल्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान धानोरकर यांनी असे वक्तव्य करून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाच आवाहन दिले आहे. तर प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवर चालणारा आहे. इथे हायकामांड व समितीच्या माध्यमातून निर्णय होतो असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राजुरा येथील सत्कार कार्यक्रमात बोलताना चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात आता मीच तिकीट वाटणार आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. या लोकसभा मतदार संघात अनेक जण विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. विधानसभेची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पक्षश्रेष्ठी कडून लोकशाही पद्धतीने उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा आहे. मात्र आता नवनिर्वाचित खासदार विधानसभेच्या तिकिटा मीच वाटणार आहे असे जाहीर केल्याने अनेक काँग्रेस पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून या पक्षात अनेक जण कधीतरी विधानसभेची उमेदवारी मिळेल या अपेक्षेने काम करीत आहे. पक्ष आमच्या कामाची दखल घेईल व विधानसभेची संधी देईल या आशेवर अनेक जण आहेत. मात्र आता खासदार धानोरकर यांनी मीच विधानसभेच्या तिकीट ठरवणार अस जाहीर केले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक इच्छूक अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे खासदार धानोरकर यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या समक्ष हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आमदार धोटे यांचेही तिकीट खासदार धानोरकर ठरवणार आहे असाच याचा अर्थ आहे.



