तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मालमत्ता धारकांवर लादलेल्या करवाढीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्थगिती दिली असली तरी सर्व मिळकत धारकांनी वाढीव कराला दि.१९ जून पर्यंत हरकत नोंदविणे आवश्यक आहे. हरकती घेतल्यानंतर त्यांना शंभर टक्के न्याय देण्याची जबाबदारी शहरातील सर्वपक्षीय नेत्यांची राहील असे आश्वासन आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिले.
चतुर्थ वार्षिक सर्व्हेक्षणामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मालमत्ताधारकांवर केलेल्या अवाजावी करवडीस मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्थगिती दिल्याची माहिती आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी,कृष्णा कारके, राजेंद्र जांभुळकर, रविंद्र दाभाडे, माजी नगरसेवक बाबूलाल नालबंद,संतोष दाभाडे पाटील, संतोष भेगडे, वैशाली दाभाडे, शोभा भेगडे,संदीप शेळके,विशाल दाभाडे, दिलीप खळदे,इंदरमल ओसवाल,आयुब सिकीलकर,रजनी ठाकूर,आशिष खांडगे,शैलजा काळोखे,सुनिल ढोरे, बाबा मुलाणी व सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार शेळके म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी करवाढीस स्थगिती दिल्यामुळे आपण अर्धी लढाई जिंकली आहे. फेर सर्व्हेक्षणाची सूचना मुख्याधिकारी यांनी दिली आहे.पण करवाढ पूर्णपणे रद्द करावी अशी आपली मागणी आहे. तळेगावकर नागरिकांच्या हितासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. नागरिकांनी करवाढीच्या हरकती दि.१९ पर्यंत नोंदवाव्यात. जास्त हरकती आल्यास शासनास निश्चित विचार करणे भाग पडेल.यासाठी नगर परिषदेत व्यवस्था केलेली आहे.
या नगर परिषदेत असलेली भाडे मूल्यावर कर आकारणीची पध्दत स्थगित करावी. व ती भांडवली मुल्यावर आकारणी करावी. कर वाढीस सर्व पक्षांनी एकत्र येऊन विरोध केला तसेच आमदार सुनिल शेळके यांनी मुख्यमंत्र्याशी पाठपुरावा करून स्थगिती आणली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
गणेश भेगडे, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य किसान मोर्चा.




