पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कांदा प्रश्नाने डोके वर काढले होते. या प्रश्नी कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढावा, असे केंद्राला कळविले होते. मात्र, समाधानकारक तोडगा न निघाल्याने लोकसभा निवडणुकीत नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांत महायुतीला फटका बसल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली.
पुणे दौऱ्यावर उपमुख्यमंत्री पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘जळगाव, नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा उत्पादन घेतात. कांदा प्रश्न पेटल्यानंतर कांदा उत्पादकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे कांदा उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांचे समाधान होईल, असा तोडगा काढण्याबाबत केंद्राला आम्ही सांगितले होते. मात्र, तोडगा न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि रावेर वगळता नाशिक, पुणे, नगर आणि सोलापूर येथील जागांवर महायुतीला फटका बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो. तेव्हा अमित शहा आणि पियुष गोयल यांना देखील याची कल्पना देण्यात आली.’




