लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसह काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाले आहे. या यशानंतर आता साऱ्यांना विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले असून त्या अनुषंगाने तयारीही सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीर राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत अनेक दावे- प्रतिदावे करताना दिसत आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक वक्तव्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. मात्र, काही तासातच नाना पटोलेंनी आपले वक्तव्य मागे घेत आपल्या भूमिकेवरून यु-टर्न घेतला आहे.
नाना पटोलेंचे आपल्या वक्तव्यावरुन यु-टर्न
महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होते. 288 जागांवर काँग्रेसची संघटनात्मक तयारी आहे. मात्र, अलायन्समध्ये राहणार नाही असा याचा अर्थ होत नाही. असे म्हणत नाना पटोलेंनी आपल्या भूमिकेवरून यु-टर्न घेतला आहे. 288 जागांवर काँग्रेस पक्षाच्या वतीनं संघटनात्मक तयारी सुरू झालेल्या आहेत.
48 लोकसभेच्याही वेळेस आम्ही त्याचं पद्धतीची तयारी केलेली होती. त्यावेळी सुद्धा अलायन्स मध्ये होतो. त्यावेळी संघटनात्मक फायदा आमच्याही मित्र पक्षाला झाला. म्हणून आम्ही आता 288 जागांवर संघटनात्मक तयारी सुरू केलेली आहे. याचा अर्थ आम्ही 288 जागा लढणार आणि अलायन्स करणार नाही, असं होऊ शकत नाही. पण, संघटनात्मक काँग्रेस पक्षाला आपली तयारी त्या पद्धतीची ठेवावी लागते, असं वक्तव्य नाना पटोले यांनी करून 288 जागांवर काँग्रेसची तयारी असल्याच्या विधानावर त्यांनी आता घुमजाव केल्याची चर्चा आहे.
अनुपस्थितिबाबत नाना पटोले यांचं स्पष्टीकरण
मविआच्या आजच्या मीटिंग संदर्भात काल अचानक आयोजन करण्यात आलं. माझे पूर्व नियोजित दौरे असल्यामुळं मी त्याला उपस्थित राहू शकत नसल्याचे, मी त्यांना कळवलेलं आहे. आमच्याकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे विधिमंडळातील पक्षनेते बाळासाहेब थोरात साहेब या दोघांना तिथं पाठवलेलं आहे. त्यामुळं पूर्वनियोजित दौऱ्यामुळे मी तिथे जाऊ शकलो नाही. असे म्हणत आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीतील अनुपस्थितिबाबत नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.



